Monday, 27 February 2017

आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांचे वर्चस्व कायम

"आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांचे वर्चस्व कायम"
शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
 
वार्ताहर ता.२७ : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून गावो गावी करोडो रुपयांची विकासकामे झाल्यामुळे मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे.शिवसेनेला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे, एकंदरीत शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे.
 
जिल्हा परिषदेच्या पाच पैकी चार जागा राष्ट्रवादीला , एक जागा शिवसेनेला तर पंचायत समितीमध्ये दहा पैकी सहा जागा राष्ट्रवादीला, तीन जागा शिवसेनेला तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे. यानिवडणुकीत भाजप काँग्रेस पक्षाने देखील उमेदवार उभे केले होते परंतु त्यांना खाते देखील उघडता आलेले नाही.
 
 'वळसे पाटील यांनी २७ वर्षात काय विकास केला' अशी जहरी टीका आढळरावांकडून करण्यात आली होती या टीकेचा समाचार घेत वळसे पाटील यांनी देखील 'विमानतळ खेडमधून का गेले , विकास आराखड्याचा काय झालं' असे मुद्दे पुढे करत पलटवार केला. विकास काम सांगण्यावरच त्यांनी भर दिला. 
 
गेल्या १५ वर्षात शिवसेनेला आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अपयश येत आहे. यंदा जुन्नर आणि खेड तालुक्यात पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता आलेली आहे परंतु खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आंबेगावात आपला करिष्मा दाखवण्यात पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत.
 
शिवसेनेकडून जि.प. माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी यंदा पारगाव-अवसरी या वळसे पाटील यांच्या घरच्या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीकडून वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील रिंगणात होते, संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष होते. अटी तटीच्या या सामन्यात विवेक वळसे पाटील यांनी बाजी मारली परंतु जास्तीचे मताधिक्य भेटू शकले नाही. गिरे यांना स्वतःच्या मेंगडेवाडीमध्ये मताधिक्य भेटू शकले नाही तर विवेक वळसे पाटील यांना अवसरी या विद्यमान जि.प. सदस्य रेवती वाडेकर यांच्या गावात मताधिक्य भेटले नाही. पारगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे संजय गवारी तर अवसरी गणातून शिवसेनेचे रवींद्र करंजखिले निवडून आले.

 राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले देविदास दरेकर हे कैलासबुवा काळे यांच्या विरोधात खासदार आढळराव याचा बालेकिल्ला असणारा पेठ-घोडेगाव या गटामधून निवडून आले. मंचर-अवसरी जि प गटामधून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुणा दत्तात्रय थोरात या शिवसेनेच्या प्रज्ञा सुरेश भोर याच्या विरोधात निवडून आल्या.अवसरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे वसंत राक्षे यांनी पक्षांतर करून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु राष्ट्रवादीचे संतोष यमनाजी भोर हे विक्रमी मताधिक्याने निवडून आले. मंचर-वडगाव-वाळुंजवाडी गणातून अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी मंचरकरांची सहानभूती मिळवून एक नंबरचे मताधिक्य घेत विजय संपादित केला. 
कळंब-चांडोली जि प गटातून राष्ट्रवादीच्या तुलसी सचिन भोर यांच्या सह पंचायत समितीच्या दोन्ही जागा चांगल्या मताधिक्याने जिंकल्या. बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या रणनीतीपुढे शिवसेनेचे पानिपत झाले. 
अमोंडी-शिनोली जि प गटातून रूपा जगदाळे या ५००० पेक्षा जास्त मताधिक्याने घेऊन विजयी झाल्या. सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पंचायत समितीच्या जागा देखील चांगल्या मताधिक्याने जिंकल्या. 

या निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळाले नसले तरी तालुक्यात विधानसभा निवडुकीपेक्षा यावेळी शिवसेनेचे वाढलेले मताधिक्य ही राष्ट्रवादी काँगेससाठी धोक्याची घंटा आहे.

Thursday, 2 February 2017

दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील पण..........!



गेल्या २ वर्षांपासून अडचणीत सापडलेला दुग्धव्यवसाय आज चांगली प्रगती करतोय, आंतराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे वाढलेले दर आणि आज बाजारात दुधाचा असलेला तुटवडा त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध विक्री दरात कमालीची वाढ झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चित समाधान उमटले आहे परंतु अशात पशुखाद्य व गाईंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ५० ते ६० हजार रुपयांना जी गाई भेटत होती तिची किंमत आज ९० हजार ते १ लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे. आधीच खाजगीकरणामुळे राज्यातील दूध संघ बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत त्यात अमूल आणि नंदिनीचा महाराष्ट्रातील प्रवेशाने भल्या-भल्यांची दूध सम्राटांची झोप उडाली आहे.
         अमूल सारख्या देश पातळीवर नावलौकिक पावलेल्या ब्रँड ने गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात चांगलाच जम बसवला आहे. गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील हा सहकारी संघ एवढा मोठा झाला कसा याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित एक गोष्ट समोर येते ती म्हणजे त्यांच्या कामाची पारदर्शकता. भ्रष्टाचाराच्या किडीने आज संपूर्ण देशाला पोखरून टाकलेले आहे, कुणी कितीही ठरवलं तर त्यातून सहज सहजी सुटका होत नाहीये याच एक जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर ट्राफिक हवालदाराला पावती नको म्हणून १०० रुपये टेकवून आपण पुढे जातो हे कटू सत्य आहे. प्रत्येक क्षेत्रात हीच परिस्थिती आहे. शेतकऱ्याचं दूध त्याच्या समोर तपासून त्याला प्रतवारीनुसार दर देणारी अमूल हि महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे. दुधाचे वजन, प्रतवारी अन त्यानुसार भाव याची गोळाबेरीज करून हि संस्था त्या शेतकऱ्याला तात्काळ दररोजची दररोज पावती करून देते. शेतकऱ्यांना हि पारदर्शकता भावते याउलट वर्षानुवर्षे दूधउत्पादक शेतकरी बांधवाना आपल्या मोठमोठ्या दुग्धसम्राटांनी अडाणी ठेवण्याचं काम केलं आहे. शेतकऱ्याला वजनात आणि प्रतवारीत मारायचं अन नंतर गोळा झालेल्या सर्व दुधात पाणी ओतून पुढे पाठवायचं हा त्यांचा प्रमुख धंदा, बरं याविषयी आवाज आज अखेर कुणी उठवलेला नाही ही आपली शोकांतिका आहे. अडलेल्या गवळल्याला लाखभर रुपये द्यायचे अन फोडाफोडीचं राजकार करायचं, पुढे काही दिवस त्याचा विश्वास सांभाळायचा अन नंतर वजन आणि प्रतवारीत मारायचं अन आपला फाळका काढायचा हे ठरलेलं आहे.
       नवनवीन ब्रँडच्या नावाखाली पशुखाद्य आज कुणीही बनवू लागलं आहे, वेगवेगळी प्रलोभने दाखवून शेतकऱ्यांना लुबाडायचं काम दिनरात सुरु आहे. सरकी पेंड च्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मोठे मोठे ट्रेडर्सवाले स्टॉक करून ठेवतात अन उन्हाळ्यात १००० रूपयांचे पोते १६०० पर्यंत नेऊन ठेवतात, उघड गवळ्याला लुटायचा कसं तर यांच्याकडून शिकावं. शेतकऱ्याने शेण खायचं अन शहरातील बड्या लोकांच्या पोरांनी त्या दुधापासून बनलेली आईस्क्रिम खायची, हे चित्र किती दिवस दिसणार ही परिस्थिती बदललीच पाहिजे.
          राज्यातील दूध संघाने खाजगी उद्योगाला न घाबरता आपल्या कामात पारदर्शकता आणून स्पर्धेत टिकणं गरजेचं आहे. सरकारने दूध संघाला विश्वासात घेऊन दुधाचे धोरण ठरवण्याची नितांत गरज आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर या धंद्यात आमूलाग्र बदल करणे गरजेचं आहे अन असं झालं तर खरंच चांगले दिवस येतील.

समीर प्रभाकर थोरात